नवी दिल्ली, वृत्तसंस्था | बॉलिवूडचे बादशहा, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना रविवारी सिनेक्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाहीत ना, अशी शंका आली. पण मला अजून खूप काम करायचयं,’ अशा शब्दात अमिताभ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराच्या यापूर्वीच्या समारंभात अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे रविवारी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६९ रोजी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्याची सुरुवात झाली. भारतीय सिनेमाचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. १० लाख रुपये रोख, शाल आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी २०१७ मध्ये या पुरस्काराने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना सन्मानित करण्यात आले होते.
मला अजून काम करायचंय – बच्चन
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ म्हणाले, ‘५० वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. तितकीच वर्षे मला या इंडस्ट्रीत झाली आहेत. या पुरस्काराचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. पण या पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मनात शंका होती की हे संकेत आहेत का? तुम्ही खूप काम केलंत, आता थांबा असे सांगण्याचे ? पण मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, अजूनही थोडे काम बाकी आहे, जे पूर्ण करायचे आहे.’