नाशिक येथे सायकलिस्ट फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

cycle nashik

नाशिक प्रतिनिधी । येथील सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नागरिकांसाठी एक उपक्रम राबविण्यात येत आहे. सायकल चालविण्या-या व्यक्तीस फाउंडेशनच्या वतीने स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे मेडिक्लेम सुविधा तसेच प्रसिद्ध दुकानांत केलेल्या खरेदीवर सूट मिळणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सायकलिस्ट फाउंडेशन कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आहेर बोलत होते की, ते आज सायंकाळी ५ वाजता तूपसाखरे लॉन्समध्ये मावळते अध्यक्ष प्रवीण खाबिया यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या वेळी स्मार्ट कार्डचे अनावरण होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी, हा या कार्ड वितरणामागचा उद्देश आहे. औषधांच्या दुकानांपासून किराणा दुकानापर्यंत सर्वच वस्तू व सेवांवर सायकलिस्टला या कार्डच्या माध्यमातून सवलत मिळणार आहे. या कार्डामुळे नाशिक सायकलिस्टचा डेटा अद्ययावत होणार असून, वेबसाइटच्या व ॲपच्या माध्यमातून सभासदांना माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या वेळी पॅलेटॉन स्पर्धेची तारीख जाहीर केली जाणार आहे. यापुढे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा कारभार पेपरलेस करण्यावर भर दिला जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांना सायकल फाउंडेशनच्या माध्यामातून मोबाइल ॲपद्वारे जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. एखाद्याला कोणत्याही स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास मोबाइल ॲपच्या माध्यमातून आपला प्रवेश निश्चित केला जाऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे सर्व सभासदांची वर्षातून एकदा शहरातील नामांकित हॉस्पिटलद्वारे वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. मुंबई नाका येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ सायकलिस्ट योगेश शिंदे, सोफिया कापडिया, शैलेश राजहंस, नंदकुमार पाटील, आहारतज्ज्ञ हेमानी पुरी उपस्थित होते.

Protected Content