सध्या राज्यात नोकर ओहोटी सुरु आहे – धनंजय मुंडे यांची टीका

dhananjay munde

अंबाजोगाई, विशेष प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटे बोलत असतील तर यासारखे मोठे दुर्दैव नाही. रोजगार देण्यात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे असे तुम्ही सांगत आहात. अहो सुरुवातीला नोकर भरतीच्या जाहिराती येत होत्या आणि आज मंदीमुळे नोकरीतून काढल्याच्या येत आहेत. नोकरभरती नाही ही तर ओहोटी आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (दि.२४) येथे केली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसुराज्य यात्रेच्या आजच्या सहाव्या दिवसाची पहिली सभा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कलम ३७० रद्द केले, त्यावेळी सलग १० दिवस त्यावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी देश आर्थिक संकटात गेला, त्यावर कोण चर्चा करणार? नामवंत कंपन्या बंद होत आहेत. अशा पद्धतीने जर उद्योग बंद होणार असतील तर तुमची आमची प्रॉपर्टी विकली तरी देश सावरणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळे आहोत. आपण पदासाठी नाही तर समाजकारणासाठी लढतो. आपल्याला एकत्र येऊन या सरकारचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्यामुळे केज मतदारसंघातुन सौ.नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, नंदकिशोर मुंदडा, शेख महेबूब, अक्षय मुंदडा, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Protected Content