मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा काँग्रेसचा विचार

 

मुंबई : वृत्तसंस्था । शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसअध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी  मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.  या वेळी प्रभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील सर्व निवडणुका हे तीन पक्ष आघाडी करून लढवतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अलीकडेच विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी आघाडी केली होती. त्यात आघाडीला चांगले यश मिळाले. परंतु मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यानंतर आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

 

मतदारसंघ पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती व महिलांना त्यात योग्य ते प्रतिनिधित्व दिसून येत नाही. त्यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे असेही पटोले यांनी सांगितले .

Protected Content