Home प्रशासन लाखोंचे पीक पाण्याखाली; खामखेडा पुलाच्या कामावर शेतकऱ्याने उपस्थित केले गंभीर प्रश्न

लाखोंचे पीक पाण्याखाली; खामखेडा पुलाच्या कामावर शेतकऱ्याने उपस्थित केले गंभीर प्रश्न

0
14

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून, या पुरामुळे मुक्ताईनगर शिवारातील एका शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळित झाल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याचा आरोप शेतकऱ्याने करत जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

मुक्ताईनगर शिवारातील गट क्रमांक ७६१/१ व ७६१/२ मधील स्वमालकीच्या शेतात उभ्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याची माहिती शेतकरी लक्ष्मण रमेश सापधरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुक्ताईनगरजवळील खामखेडा पुलानजीक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात आल्याने पूर्णा नदीचा नैसर्गिक प्रवाह अरुंद झाला. मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीत अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. मात्र, नदीचा प्रवाह सुरळीत राहिला नसल्याने पाणी पुढे हतनूर धरणाच्या दिशेने वाहू शकले नाही. परिणामी पुराचे पाणी शेतामध्ये शिरले आणि उभे पीक पूर्णपणे वाहून गेले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण हंगाम धोक्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शेतकरी लक्ष्मण सापधरे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शेताचा तात्काळ पंचनामा करण्याची, शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई मंजूर करण्याची, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची तसेच चौकशीत नदीप्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पूरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत व न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडूनही करण्यात येत आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि पात्र शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करण्याबरोबरच नदीपात्रातील अडथळ्यांची चौकशी करून जबाबदारांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound