जळगाव प्रतिनिधी । दारुची अवैधरित्या विक्री करणार्या एकास शनिपेठ पोलिसांनी धाड टाकत अटक केली. त्याच्याकडून २ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कालिंका माता चौफुली जवळील हॉटेल सहाराजवळील एका टपरीच्या आडोशाला एक जण अवैध रित्या दारुची विक्री करीत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे, राहूल पाटील, रविंद्र पाटील, अमित जगताप, अनिल कांबळे यांचे पथक तयार करुन धाड टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने लागलीच घटनास्थळी जावून पाहणी केली असता, याठिकाणी ललित कालिदास पाटील (वय ३७) रा. योगेश्वर नगर हा कापडी पिशवीत विदेशी दारु घेवून विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्यावर धाड टाकत ताब्यात घेतले असता त्याच्याकडून २ हजार ५५० रुपये किमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.