राजोरा येथे श्रीराम क्रिकेट लीगच्या वतीने क्रिकेट स्पर्धा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील राजोरा येथे श्रीराम क्रिकेट लीगच्या वतीने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप झाला. या स्पर्धेत अंतिम विजय श्रीराम संघाने मिळवला असून, विजयी आणि उपविजयी संघांना आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण ३५ सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात आले. अंतिम फेरीत कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट टीम आणि राजोरा येथील श्रीराम क्रिकेट टीम यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. यात शिवशक्ती क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले तर श्रीराम संघ उपविजेता ठरला.

बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार अमोल जावळे यांनी विजयी संघांचे कौतुक करत स्मृतिचिन्ह व रोख रकमेचे बक्षीस प्रदान केले. त्यांनी खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी आयोजक सागर कोळी, नितीन व्यंकट चौधरी तसेच सांगली खुर्द येथील दिगंबर कोळी, आकाश धनगर, संजय धनगर, सुधाकर कोळी, राजोरा येथील मधुकर नारखेडे, कल्पेश पाटील, चेतन पाटील, बापू कोळी यांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्तिकेंद्र प्रमुख मयूर महाजन यांनी केले, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर उंबरकर आणि विशाल कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Protected Content