जळगाव, लीना पाटील | सृजनशीलता आणि रचनात्मकतेला कोणतेही भौगोलिक बंध नसल्याचे मानले जाते. यामुळे अगदी ग्रामीण भागातूनही अतिशय सशक्त आणि ती देखील अस्खलीत इंग्रजीत अभिव्यक्ती होत असल्याचे दिसून येत आहे. यावल तालुक्यातील भालोद या गावातील मोहिनी गोविंदा नेहेते या युवतीने हीच बाब सिध्द केली आहे. मोहिनीने अवघ्या काही महिन्यांमध्येच सहा इंग्रजी पुस्तकांचे लेखन केले असून आता तिच्या हातात चार पुस्तके आणि एक चरित्रग्रंथाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जाणून घ्या मोहिनीच्या अनोख्या सृजनयात्रेची वाटचाल…!
भालोद हे यावल तालुक्यातील एक मोठे गाव. मूळचे भालोदकर असणार्या अनेक मान्यवरांनी जगभरात नावलौकीक कमावला आहे. येथील एका सुखवस्तू शेतकरी घरात मोहिनीचा जन्म झाला. बालपणापासूनच शिक्षण आणि संस्काराची अतिशय उत्तम जडणघडण झाली. सावदा येथील स्वामीनारायण गुरूकुलमधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रीकीतून पदवी संपादन केली. गरज, आवड वा करियर म्हणून पुढे नोकरी करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याने यासाठी तिने कोणताही प्रयत्न केला नाही. तथापि, मोहिनीची एकच आवड म्हणजे आनंदी जीवन जगणे ! आपल्या भोवतालाशी विलक्षण पध्दतीत समरस झालेली मोहिनी ही अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे स्वप्न पाहत होती, याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न देखील करत होती. इतक्यात तिच्यावर खरं तर संपूर्ण नेहेते कुटुंबावरच वज्राघात झाला. एका दुर्दैवी घटनेत मोहिनीच्या वडलांचा मृत्यू झाला. अत्यंत संवेदनशील असणारी ही तरूणी यामुळे उन्मळून पडली.
अतिशय सालस, सज्जन आणि कुणाच्याही अध्यात-मध्यात नसणारे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यात कशाचीही कमतरता नसतांना आपले वडील असे अचानक परलोकी कसे निघून गेले ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मोहिनीने प्रयत्न केला…शोध घेतला. हाच शोध किंबहुना उत्तरांसाठी आसुसलेली हीच यात्रा तिला १००८ श्रीश्री रविशंकर यांच्याकडे घेऊन गेली. त्यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ या चळवळीशी मोहिनी जुडली. तिने याच्याशी संबंधीत सर्व कोर्सेस पूर्ण केलेत. यातून तिला गहन शांती, मौन आणि एकूणच आध्यात्मीक अनुभूती आली. यासोबत तिला अचानक जगाला काही तरी सांगावासे वाटले. अचेतन मनातील कुठल्या तरी कोपर्यातून आकस्मिकपणे सृजनाचे झरे फुटले अन् ती सुसाट वेगाने लिहायला लागली. बरं हे लिखाण ‘फिक्शन’ अथवा ‘नॉन फिक्शन’ या प्रकारातील नव्हे तर गहन आध्यात्मिक, बोधपर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विलक्षण सकारात्मकतेचा संदेश देणारे, जीवनावर भरभरून प्रेम करणारे आणि आयुष्यातील रचनात्मकता, आध्यात्मिकता, गीत, नृत्य, भक्ती, संगीत आदींची महत्ता अधोरेखीत करणारे असे होते.
अजून एक विलक्षण बाब म्हणजे तिचे सर्व लिखाण हे अस्खलीत इंग्रजीत आहे. खरं तर मराठी मातृभाषा असतांनाही तिला अभिव्यक्तीसाठी इंग्रजीच आवडते. कारण ही भाषा लिखाणासाठी तिला अधिक सुलभ, स्वाभाविक आणि जवळची वाटते. भालोद सारख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असणार्या मोहिनीची इंग्रजी भाषा शैली ही विलक्षण प्रवाही, रसाळ आणि लयबध्द आहे. तिचे आजवर ब्लासमींग कॉन्शसनेस, एक्सप्रेशन ऑफ डिव्होशन, लाईफ एक्सप्लोअर्ड ( आफ्टर एक्सपेरियन्सींग स्टीलनेस विदीन ); इव्हॉल्व्हींग सेन्स; कान्हा आणि नेचर इज गाईड ही सहा पुस्तके प्रकाशित झाली असून ती अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध आहेत. यातील ‘कान्हा’ हे पुस्तक हिंदीतील असून इतर पाच पुस्तके इंग्रजीतील आहेत. यासोबत लवकरच तिची चार पुस्तके प्रकाशनच्या वाटेवर असून येत्या दोन महिन्यात ही सर्व पुस्तके प्रकाशित होणार आहेत. तर, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या चरित्रग्रंथाचे काम देखील आता शेवटच्या टप्प्यात आहे.
अत्यंत मनस्विनी अशा मोहिनीचे आपला भोवताल विशेष करून आपल्या गावावर निरातीशय प्रेम आहे. आपले घर, कुटुंब, मित्र परिवार, शेती-शिवार, भोवतालचे लोक व विशेष करून बच्चे कंपनी हा तिच्या आस्थेचा विषय आहे. मुलांना आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून योग्य दिशा मिळावी. त्यांना शिक्षणासोबत संस्कारही मिळावेत यासाठी यावल येथे सर्व सुविधांनी युक्त असणारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मोहिनीचा मानस आहे. भालोदचे थोर सुपुत्र माजी खासदार तथा माजी आमदार दिवंगत हरीभाऊ जावळे यांचा आपल्या आजवरच्या वाटचालीत मोठा वाटा असल्याचे मोहिनी कृतज्ञतेने नमूद करते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी बाबांनी खूप प्रोत्साहीत केल्याचे तिचे म्हणणे आहे. आता त्यांचे चिरंजीव अमोलदादा आणि त्यांचे कुटुंब देखील आपल्यावर त्याच मायेने प्रेम करते, प्रोत्साहीत करते असे ती आवर्जून नमूद करते. तर अलीकडेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील तिच्या वाटचालीचे कौतुक करून सर्वतोपरी मदतीने आश्वासन दिले आहे. तर डॉ. उल्हासराव पाटील यांनी देखील तिच्या सृजनाचे कौतुक केले आहे.
जीवन हे सुंदर आहे, ते अनमोल असून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा अशी साधी-सोपी-सरळ फिलॉसॉफी असणारी मोहिनी गोविंदा नेहते ही विशीतली तरूणी आज परिसरात शिक्षणक्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून आहे. आघातांशी दोन हात करणारी ही जिजाऊची लेक; ज्ञानामृताचे ग्रहण करणारी ही सावित्रीची लेक अन् अव्याहत सृजन करणारी ही बहिणाबाईचे लेक भालोदच नव्हे तर परिसराच्या कौतुकाचा व अभिमानाचा मानबिंदू बनली आहे. तिच्या भावी वाटचालीस लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा. आणि अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी शाळा उभारण्याचे तिचे स्वप्न साकार होवो, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा…!