पी. जे. बचाव रेल्वे कृती समिती बैठकीत आंदोलनाचा पवित्रा

पाचोरा, प्रतिनिधी | कोरोना काळात बंद करण्यात आलेली पाचोरा ते जामनेर (पी.जे.) सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.

 

पाचोरा ते जामनेर (पी. जे.) रेल्वे ही ब्रिटिशकाळापासून जवळ जवळ शंभर वर्षापासून पाचोरा ते जामनेर रोज दोन फेऱ्या होत होत्या. या गाडीने पाचोरा – जामनेर दरम्यान अनेक छोटे-मोठे खेडे जोडलेले असून कमी पैशात प्रवास होत असल्याने अनेक विद्यार्थी, शेतकरी, मजूर वर्ग, व्यापारीवर्ग अपडाऊन करीत असत. परंतु, कोरोना काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना काळात बंद असलेली रेल्वे सेवा सुरळीत होत असतांना पी. जे. सेवा मात्र बंदच आहे. ही सेवा पूर्ववत होण्यासाठी पाचोरा शहरातील जागृत नागरिक, संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून पाचोरा व जामनेर, शेंदुर्णी, वरखेडी, पहूर येथील नागरिक, प्रवासी संघटना तसेच व्यापारी एकत्र आले आहेत. यास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ व भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच खासदार उन्मेष पाटील यांनी त्वरित लक्ष देऊन पाचोरा रेल्वे बचाव कृती समितीस भेट देऊन जर पी. जे. रेल्वे बंद झाली तर त्यासाठी मी स्वतः आंदोलनासाठी मैदानात उतरले मी पक्षभेद न करता तुमच्या सर्वांच्या सोबत असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या समितीने यासंदर्भात भुसावळ येथे रेल्वे प्रबंधक डी. आर. एम. यांना निवेदन दिले. यावेळी समिती अध्यक्ष खलील देशमुख, पप्पू राजपूत, अरुण पाटील, सचिन राजपूत, देवीदास पाटील, सुधाकर सोनवणे व अशा अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी पी.जे. रेल्वे चालू होणार नाही असे संकेत दिसत आहे. त्यामुळे आज रोजी शहरातील हुतात्मा स्मारकामध्ये पी. जे. रेल्वे बचाव कृती समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी खलील देशमुख, अॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, अनिल येवले, मनिष बाविस्कर, नंदकुमार सोनार, विधीतज्ञ आण्णा भोईटे, पप्पु राजपुत, भरत खंडेलवाल, अरुण पाटील उपस्थित होते. ही बैठक खासदार उन्मेश पाटील यांनी दिलेले आश्वासन व आंदोलनासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी नियोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांचा एकच नारा पाचोरा – जामनेर रेल्वे सुरू होईल याबाबत निर्धार करा. तसेच भविष्यात धरणे आंदोलन, मोर्चा, उपोषण, गाव बंद, रेल्वे रोको असे अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलन छेडण्याबाबत एकमत झाले.

Protected Content