जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पाऊले उचलली आहेत. मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तक्रारींच्या आधारावर, जळगाव आणि भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने १ आणि ३ जुलै २०२५ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा आणि बोदवड तालुक्यातील ऐनगाव येथे अचानक छापे टाकून मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत गावठी, देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, काही आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कानळदा येथे मोठी कारवाई
१ जुलै २०२५ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा येथे केलेल्या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश मिळाले. या ठिकाणी ३ गुन्हे दाखल करत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ७० लिटर गावठी दारू, २.७ लिटर देशी दारू, ४.८६ लिटर विदेशी दारू आणि ४.५ लिटर बिअर असा एकूण १३ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अवैध दारूच्या निर्मिती आणि विक्री साखळीला मोठा धक्का देणारी ठरली आहे.
ऐनगावातही अवैध दारूसाठा जप्त
याच मोहिमेअंतर्गत, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी बोदवड तालुक्यातील ऐनगाव येथेही पथकाने कारवाई केली. येथे १ गुन्हा दाखल करत १ आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १३.५ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे ६ हजार रुपये आहे.