नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा आज १०० कोटींचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात कोरोना विरोधी लसीचे लसीकरण सुरू करण्यात आली असून याला अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. या पार्श्वभूमिवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना लसीचे ९९ कोटीहून अधिक डोस देण्यात आले असून आज ऐतिहासिक १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
देशात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १ फेब्रुवारीला एक कोटी डोस देण्यात आले. १५ जून रोजी २५ कोटी डोस पूर्ण झाले तर ६ ऑगस्ट रोजी ५० कोटी डोस पूर्ण झाले. त्यानंतर १३ सप्टेंबरला ७५ कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला तर मंगळवारी, १९ ऑक्टोबरला ९९ कोटीहून अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, देशातील लसीकरणाच्या १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याचे स्वागत करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लॉंच केलं जाणार आहे. लसीकरणाने १०० कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम सॉंग रिलीज केले जाणार आहे.