कर्नाटक आता सांगली, सोलापूरची मागणी करणार

 

 

बेळगावः वृत्तसंस्था । आता आम्ही सांगली आणि सोलापूरची मागणी करू असं म्हणत बोम्मई यांनी मराठी बांधवांच्या संतापात भर घातली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटकातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून आगपाखड केली आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी केली गेली. आता कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.

 

कर्नाटकच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याने सीमाभागात पडसाद उमटत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री लक्ष्मण सावेडी, गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्धव ठाकरेंचा निषेध केला आहे. ‘भाषावर प्रांतरचनेच्या वेळी अन्याय झालेला संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होणं गरजेचं आहे. आणि तो आम्ही तो विलीन करून घेऊ’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हुतात्मा दिनी म्हणाले होते. यावरून कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बेळगावी हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. यामुळे जुने मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठकारेंनी करू नये, असं सिद्धारामय्या म्हणाले. एवढचं नव्हे सिद्धारामय्या यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला. निर्णय झालेल्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी राजकारण करू नये. तुम्ही फक्त शिवसेनेचे प्रमुख नाही आहात तर राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री आहात, असंही सिद्धारामय्या म्हणाले.

 

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांची भाषा ही कुरघोडी करणाऱ्या चीनच्या विस्तारवादासारखी आहे, असं कुमारस्वामी म्हणाले. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हे बेजबाबदार आणि कर्नाटकच्या सीमाभागावर घाला घालणारं आहे. ही भाषा चीनच्या विस्तारवादासारखी आहे. भाषा रचनेनुसार विभागणी झाली आहे. पण कर्नाटकचा कुठलाही भाग तोडण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही राज्यातील सौहार्दाला ठेच पोहोचेल, असं कुमारस्वामी म्हणाले.

Protected Content