मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत सावधगिरीचा इशारा दिला जात असतांना गत चोवीस तासांमध्ये राज्यभरात कोरोना रूग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन आवृत्तीचा प्रसार मोठ्या संख्येने होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले असतांना आता महाराष्ट्रात कोरोनाची रूग्णसंख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात तब्बल ८ हजार ६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल ५ हजार ३०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज एका दिवसात ही संख्या जवळपास साडे आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज ८ हजार ६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ७६६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या मुंबईत ५ हजार ४२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव आता दुपटीने होत असल्याचं अधोरेखीत झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६६ लाख ७८ हजार ८२१ इतकी झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ७५ हजार ५९२ नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर १ हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.