पुणे । अॅस्ट्रेझेनेका, ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांच्यातर्फे संयुक्तरित्या विकसित करण्यात आलेल्या कोविशिल्ड या लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीस उद्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे.
पुणे येथील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ससून रुग्णालयात सोमवार दिनांक २१ पासून कोविडशिल्डच्या मानवी चाचणीस प्रारंभ होणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू केलेली आहे. आतापर्यंत ४९ स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह चाचणी, अँटीबॉडी चाचणी करण्यात येईल. ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यातील चार रुग्णालयांसह संपूर्ण भारतात १७ ठिकाणी १५०० स्वयंसेवकांवर तिसर्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. यापूर्वी सिरमची दुसर्या टप्प्यातील कोविशिल्ड लस भारती विद्यापीठात २६ ऑगस्टला दोन स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर वढू बुद्रुक येथील केईएम सेंटर, ससून रुग्णालय येथेही लस देण्यात आली आहे.