जालना प्रतिनिधी । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोविड लसीच्या सरावाची पाहणी केल्यानंतर ही लस नेमकी कशा प्रकारे दिली जाईल याची माहिती दिली आहे.
आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. त्याची पाहणी करण्यासाठी टोपे जालन्यातील चाचणी सुरू असलेल्या केंद्रावर आले होते. यानंतर त्यांनी या लसीबाबतची माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले की, आपण मतदान करण्यासाठी केंद्रावर जातो, त्यावेळी तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचार्यांशी होते. लसीकरण केंद्रावरदेखील पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय केंद्रात प्रवेश करता येणार नाही. पोलिसांना ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंडिफिकेशन रुममध्ये जाईल. तिथे शिक्षक किंवा शिक्षिका असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठवण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी शिक्षक/शिक्षिकेकडून कोविन अॅपच्या माध्यमातून केली जाईल असे ते म्हणाले.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. त्या ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. त्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. काहींंना ताण-तणावाअन्य व्याधी असता. परिणामी त्यांना लस दिल्यानंतर भोवळ येऊ शकते. असा काही प्रकार घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचं निरीक्षण करण्याचं काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणार्या महिला करतील.
आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची लस ही अतिशय सुरक्षित असली तरी कोरोनाची लस घेतली की निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असं अनेकांना वाटू लागलं आहे. पण कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणं गरजेचं असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.