कोरोनाचे रूग्ण घटले…मात्र मृत्यू वाढले !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी गत चोवीस तासांमध्ये विक्रमी संख्येने मृत्यू झाल्याचे आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, गत काही दिवसांपासून सातत्याने कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट होतांना दिसून येत आहे. यामुळे दररोज तब्बल चार लाखांच्या वर गेलेला रूग्णांचा आकडा हा आता तीन लाखांच्या आत आला आहे. तथापि, मात्र रूग्णांच्या मृत्यूची संख्या ही वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यातच गेल्या चोवीस तासांमधील मृतांची आकडेवारी ही धास्तावणारी ठरली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मंगळवारी दिवसभरात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यू संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या दोन लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे.

यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात ३० हजार आणि तामिळनाडूत ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Protected Content