जळगाव कृष्णराज पाटील । गेल्या पाच सहा दिवसांपासून युक्रेन आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जलदगतीने अन्य देशात परिणाम दिसून येत आहेत. जीवनावश्यक वस्तू तसेच सोने चांदीच्या दरात पहिल्या दोन दिवसातच परिणाम दिसून आले आहेत.
युक्रेन आणि रशियातील युद्ध सुरु होऊन पाचसहा दिवस झाले असून या युद्धाचे पडसाद शेजारील राष्ट्रांवर लगेच दिसून येत आहेत. युक्रेन मधील कच्च्या तेलाच्या निर्यातीवर परिणाम झाला असून क्रूड ऑइल च्या बॅरलच्या किमतीत वाढ झाल्याने विशेषतः भारतात त्याचे परिणाम दिसून येत आहेत. डिझेल पेट्रोल च्या किमतीत वाढ झालेचे दिसून येत असून त्यांचे अप्रत्यक्षरित्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातच नव्हेतर राज्यासह भारतात संसर्गाची तिसरी लाट जेमतेम ओसरली असून अजूनहि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत आहे. सध्यस्थितीत सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारीच्या अखेरीस रशिया युक्रेन या दोन देशांमधील युद्धाला तोंड फुटले, याचा परिणाम भारतात सर्वसामान्य जनजीवनाशी निगडित जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर झालेला दिसून येत आहे.
खाद्यतेलाच्या किमतीत २४ ते ३० टक्के वाढ
पेट्रोल डिझेल च्या दरात वाढ झाल्याने अप्रत्यक्षरित्या वाहतूक, दळणवळण व्यवस्थेत छुपी दरवाढ झाल्याने त्याचे परिंणाम जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढ किमान २४ ते ३० टक्के झाली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या सप्ताहात सोयाबीन खाद्य तेलाचे एक किलो पाऊचचे दर ११५ ते १२० रुपये होते तेच दर सद्यस्थितीत १७० ते १७५ रुपये इतके आहे. तर शेंगदाणा तेल २२५ ते २५० च्या दरम्यान आहेत. यासह साखर, साबुदाणा, शेंगदाणे, मसाल्याच्या वस्तूत देखील पाच ते दहा रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरात तेजीने वाढ
युक्रेन रशिया च्या युद्धाचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीवर झाला असून दरवाढ झालेली दिसून येत आहे. सोने चांदीच्या दारात सतत वाढ होत असून युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या सप्ताहात बुधवारी जळगांव सुवर्ण नगरीत सोन्याचे दर ५१हजार ४०० रुपये प्रतितोला तर चांदी ६५हजार ५२० रुपये प्रति किलो दर होते, सप्ताहाच्या अखेरीस सोने प्रति टोला ५२हजार ७५० रुपये तर चांदी ६७हजार ५८० रुपये प्रति किलो असे होते. सोन्या चांदीच्या आयातीवर जीएसटी तसेच दागिन्यांच्या घडणावळीवर शुल्क आकारले जाते तसेच या युद्धाचा परिणामामुळे देखील सोने चांदीच्या दरात तेजीने वाढ झाली असून सोने २. २२ टक्के तर चांदी ३. १४ टक्के किमान दरवाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात मात्र पुन्हा दर काहीसे कमी झाले आहेत. युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिल्यास सोन्याच्या दरात आणखी दरवाढ होईल, असे जळगाव शहरातील सुवर्णकार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.