धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्री चिंतामणी मोरया ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पुजन, उत्तरांग हवन, कलशारोहन स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
मंदिरातील गणेशाची मूर्ती ही पुरातन काळातील असून ३०० वर्षांपूर्वीची असल्याने जीर्ण झाली होती. या मूर्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्थापन व वज्रलेपन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे मूर्तीचे आयुष्य वाढणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या समाप्तीनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आजपासून भाविकांसाठी मंदिराचे मुखदर्शन खुले करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना आता पुन्हा श्री चिंतामणी मोरयांचे दर्शन घेता येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन देवाचा आशीर्वाद घेतला.