काँग्रेसला सावरकरांबद्दल आदर – मनमोहन सिंग

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने वीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करणार, असे आश्वासन दिल्याने राजकारण तापले असतानाच माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचे स्पष्ट करत भारतरत्न कुणाला द्यायचा हा निर्णय एका समितीमार्फत घेतला जातो, याकडे लक्ष वेधले.

 

सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसला आदर आहे, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्ट तिकिटाचे अनावरण करून त्यांचा सन्मान केला होता, असे मनमोहन यांनी सांगितले. सावरकर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते आणि काँग्रेस हिंदुत्वाच्या विचारधारेचे कधीही समर्थन करणार नाही, असे मनमोहन यांनी पुढे स्पष्ट केले. सावरकर यांना भारतरत्न देण्यावरही त्यांनी मतप्रदर्शन केले. अशी मागणी कुणी करत असले तरी भारतरत्न कुणाला द्यायचा, हे ठरवण्यासाठी एक समिती आहे आणि ही समितीच त्यावर निर्णय घेते, असेही मनमोहन म्हणाले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही मनमोहन यांनी भाष्य केले. कलम ३७० हटवण्यास आमचा विरोध नाही, मात्र या निर्णयाची ज्याप्रकारे अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यास आमचा आक्षेप आहे, असे मनमोहन म्हणाले. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबतही (एनआरसी) मनमोहन यांनी भूमिका मांडली. आमचा एनआरसीला विरोध नाही, मात्र आपल्या कायद्यात मुस्लिम समाजावर अन्याय होत असून माणुसकीचे भान राखले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Protected Content