महापालिका प्रशासनाविरोधा काँग्रेसचे निदर्शने; नागरी समस्या सोडविण्याची मागणी !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाढत्या समस्या आणि नागरी सुविधांच्या अभावावर आवाज उठवत जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापालिका प्रशासन व शासनाला निवेदन दिले आहे. या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास काँग्रेसकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख समस्या
काँग्रेसच्या निवेदनात विविध नागरी समस्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेची वाढीव कर आकारणी (घरपट्टी) असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यामुळे घरपट्टी कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, गाळेधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

शहरातील रस्ते आणि गटारींची दुरवस्था मोठी समस्या बनली आहे. याबाबत योग्य ऑडिट करून दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची गरज काँग्रेसने अधोरेखित केली आहे. याशिवाय, पथदिव्यांच्या नियोजनाचा अभाव असल्याने ते दिवसा सुरू व रात्री बंद असतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हॉकर्ससाठी झोन आणि अतिक्रमण हटाव मोहीम
शहरातील प्रत्येक मार्केटमध्ये अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या समस्येने व्यापारी आणि नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी. तसेच, हॉकर्ससाठी ‘हॉकर्स झोन’ निश्चित करावा, कारण त्यांच्याकडून कर वसूल केला जातो, परंतु त्यांना योग्य जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशी तक्रार काँग्रेसने केली आहे.

आरोग्य व स्वच्छतेच्या समस्यांकडे लक्ष द्या
गेंदालाल मिल परिसरात अस्वच्छतेची मोठी समस्या आहे. तळमजल्यावरील घरांमध्ये गटारीचे सांडपाणी जात असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून गटारींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, नवीन वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा जसे की रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठा पुरवले जावेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सिटी स्कॅन, एमआरआय, पॅथॉलॉजी आणि औषधांची उपलब्धता महत्त्वाची आहे. त्यामुळे महापालिका आणि प्रशासनाने त्वरित या सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन
या सर्व मागण्यांसाठी काँग्रेसच्या शहराध्यक्ष शामकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर, दीपक सोनवणे, शफी बागवान, श्रीधर चौधरी, राहुल भालेराव, जाकीर बागवान, विजय वाणी, समाधान पाटील, किरण अडकमोल, मुजीब पटेल, अमजद पठाण, मिराताई सोनवणे, सखाराम मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. जर प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Protected Content