मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व आमदार हे महिनाभराचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार असून आपण स्वत: वर्षभराचे वेतन यासाठी देणार असल्याची घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज केली आहे.
आज बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. सरकारने आधीच लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे. तथापि, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. यासाठीचा निधी कसा उभारावा ही मोठी समस्या आहे. यासाठी काँग्रेसचे सर्व आमदार एक महिनाभराचे वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. तर आपण वैयक्तीकरित्या मंत्री म्हणून मिळणारे वर्षभराचे वेतन हे या निधीत देणार असल्याची माहिती देखील ना. बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी दिली. तर प्रदेश काँग्रेस समिती देखील पाच लाख रूपयांची मदत करणार आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात प्रमुख असलेल्या संगमनेर येथील अमृत उद्योग समूहातील सुमारे पाच हजार कर्मचार्यांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देखील बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी दिली.