मुंबई-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसंस्था । एकीकडे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली असताना काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नसल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते देखील अतिशय सतर्क झाले आहेत. आपले खासदार फुटू नयेत याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यात काँग्रेसच्या ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तर तिघांच्याही आपण संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नसल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली आहे.
दरम्यान, आज दुपारच्या कॅबिनेटच्या बैठकीत विधानसभा बरखास्त होणार का ? याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील भारतीय जनता पक्षाची बैठक सुरू असून यात सत्ता स्थापन करण्याबाबत विचार मंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.