नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाच संसदीय समित्यांची स्थापना केली. यावेळी त्यांनी समितीच्या अध्यक्षांचीही घोषणा केली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची संसदीय व्यवस्थेतील सर्वांत महत्त्वाची समिती असलेल्या लोक लेखा समितीच्या (पीएसी) अध्यक्षपदी निवड केली. ही समिती सरकारी खर्चावर बारीक लक्ष ठेवते. यासोबतच इतर समित्यांचीही स्थापना केली आहे.
या समितीचा कार्यकाल ३० एप्रिल २०२५ रोजी संपणार आहे. संसदीय प्रणालीमध्ये लोकलेखा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. या समितीमध्ये लोकसभेतील १५ खासदार आणि राज्यसभेचे ७ खासदार म्हणजे सभापतींसह एकूण २२ खासदारांचा समावेश आहे. के. सी. वेणुगोपाल, टी. आर. बालू, निशिकांत दुबे, जगदंबिका पाल, जय प्रकाश, रविशंकर प्रसाद, सीएम रमेश, मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्याशिवाय लोकसभेतील प्रा. सौगता रॉय, अपराजिता सारंगी, डॉ अमर सिंह, तेजस्वी सूर्या, अनुराग सिंह ठाकूर, बालशौरी वल्लभनेनी आणि धर्मेंद्र यादव समितीचे सदस्य आहेत. तसेच राज्यसभेतून अशोक चव्हाण, शक्तीसिंह गोहिल, डॉ. के. लक्ष्मण, प्रफुल्ल पटेल, सुखेंदू शेखर रॉय, तिरुचीचे शिवा आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आहेत.