जातीच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – जावडेकर

prakash javadekar

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेस जातीच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख भारताचे ‘हिंदू जिना’ असा केला. यावरुनच जावडेकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

 

जावडेकर यांनी ट्विट करीत म्हटले की, “गेल्या अनेक दशकांपासून अल्पसंख्यकांचा मतांसाठी वापर करणारी काँग्रेस देशात जातीच्या आधारे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी हिंदू जिना असे केलेलं वक्तव्य काँग्रेसचा जातीय सलोखा बिघडवण्याचा अजून एक प्रयत्न आहे,”.

ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. गोगोई यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान आरोप करतात की, आम्ही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. पण त्यांनी आपला स्तर शेजारी राष्ट्रांपेक्षाही खाली आणला आहे. मोदी जिना यांच्या दोन देश सिद्धांताच्या दिशेने वाटचाल करत असून भारताचे हिंदू जिना म्हणून उदयाला येत आहेत”.

Protected Content