
मुंबई, वृत्तसेवा । NEET UG 2026 पेपरफुटी आणि त्यानंतर RE-NEET परीक्षा घेण्याच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांमध्ये फी परताव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. NTA ने आधीच परीक्षा शुल्क परत करण्याचे जाहीर केले आहे, मात्र ते विद्यार्थ्यांच्या खात्यात येईल की नेट कॅफे किंवा सेतू केंद्राच्या माध्यमातून, याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे की RE-NEET 2026 साठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. मात्र पूर्वी भरलेले परीक्षा शुल्क परत कसे केले जाईल, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ आहे. सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून 1700 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये फी आकारण्यात आली होती. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी नेट कॅफे किंवा सेतू केंद्रांमार्फत अर्ज केला असल्यामुळे ऑनलाइन व्यवहार हे संबंधित केंद्रांच्या खात्यांतून झाले, तर काही विद्यार्थ्यांनी रक्कम थेट रोख स्वरूपात दिली होती.
NTA कडून फी परताव्याची घोषणा झाल्यानंतर मुख्य प्रश्न असा निर्माण झाला आहे की, परतावा मूळ व्यवहार ज्या खात्यातून झाला त्याच खात्यात जमा होणार की नाही. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे किंवा पालकांचे बँक तपशील अद्ययावत ठेवण्याचे आणि थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात फी जमा होण्यासाठी पारदर्शक यंत्रणा लागू करण्याची सूचना दिली आहे.
पेपर फुटण्याच्या प्रकरणात तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहिती नुसार पेपर नाशिक किंवा इतर केंद्रांमधून नसून थेट NTA च्या कार्यालयातून लीक झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित तपास यंत्रणांनी या दृष्टीने चौकशी सुरू केली आहे.
सामाजिक माध्यमांवरून तयार केलेले नेटवर्क या प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने विद्यार्थ्यांना करिअर काऊन्सिलिंगच्या नावाखाली मार्गदर्शन देत तयार केले होते. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अर्ज, प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षांशी संबंधित सेवा दिल्या जात होत्या. या नेटवर्कच्या माध्यमातून विविध राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रश्नपत्रिका विक्री रॅकेट चालवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Central Bureau of Investigation ने महाराष्ट्रातील तपासाचा विस्तार करत अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक येथून अटकसत्र सुरू केले आहे. अहिल्यानगरमधील ओंकार शिंगोटे यास अटक करण्यात आली असून धनंजय लोखंडे हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. धनंजयने विविध शहरांतील एजंटद्वारे NEET प्रश्नपत्रिका विक्रीचे जाळे तयार केले होते. मनिषा वाघमारे आणि शेषराव सोळंकी यांच्यासारख्या व्यक्तींमार्फत पैसे गोळा करणे आणि इच्छुक विद्यार्थ्यांचा शोध घेणे अशा कामांचा तपासात समावेश आहे. शेषराव सोळंकीच्या मोबाईलमधील संभाषणांमुळे या रॅकेटचे अधिक धागेदोरे समोर आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा काळ चिंता आणि गोंधळाचा आहे. NTA कडून फी परताव्याच्या प्रक्रियेची तात्काळ स्पष्टता आणि पारदर्शकता आवश्यक आहे, तर संबंधित तपास सुरू असलेल्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



