पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मिठाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता आज बुधवार, दि. १७ रोजी करण्यात आली.
दि. ६ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. विविध उपक्रमांनी नटलेल्या या महोत्सवातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील शिक्षक बंधू- भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पाचोरा शहरातील मिठाबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांच्या हस्ते कै. बाळासाहेब के. एस. पवार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिभा परदेशी यांनी स्वागत गीत व ईशस्तवन गायन केले.
याप्रसंगी माणिकराजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रविंद्र चव्हाण, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, अंबालाल पवार, सुभाष जाधव, वरिष्ठ लिपिक शिवाजीराव बागुल, ज्येष्ठ शिक्षिका प्रा. प्रतिभा परदेशी, उज्वला महाजन, कुंदा पाटील, मनीषा चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांनी सतत १२ दिवस चाललेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आढावा सादर केला.
प्राथमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक आर. ओ. पाटील तसेच माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका उज्वला देशमुख (महाजन) यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्राचार्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. महोत्सवाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व गायन स्पर्धा या मधील विविध गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यानिमित्ताने माजी नगरसेविका विजयालक्ष्मी सतीश शिंदे यांचे तर्फे प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यां – विद्यार्थिनींना लेखन साहित्य संच भेट देण्यात आला. कोरोना काळात मातृछत्र व पितृछत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व लेखन साहित्य संच देण्यात आला. तसेच विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींचे मुक्तकंठाने कौतुक केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दरम्यान सकाळी ११ वाजता सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी जागेवर उभे राहून सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. प्रा. शिवाजी शिंदे व कल्पना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शिवराम पाटील, शकील खाटीक, धनराज धनगर, राकेश पगार यांनी परिश्रम घेतले.