मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई उच्च न्यायालयाने कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील पाच आरोपींना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यापासून ते तुरुंगातच होते. मात्र, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय लवकरच अपेक्षित आहे.