पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर टप्पेनिहाय आंदोलन केले जात असून आजच्या एकदिवसीय ‘भारत बंद’ला पाचोरा शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे.
यापूर्वी देखील ओबीसी मोर्चातर्फे धरण, आंदोलन, रॅली प्रदर्शन करण्यात आले होते. त्यातील पुढच्या टप्प्यानुसार ओबीसी मोर्चातर्फे आज २५ मे २०२२ रोजी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात येत असुन पाचोरा शहरात सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक रोड, भडगाव रोड, जारगाव चौफुली, भारत डेअरी येथे अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद दिसुन येत आहे.
या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सदरील भारत बंदचे केंद्र सरकार विरोधात पुढील विविध सामाजिक मुद्यांवर आधारित करण्यात आले आहे. केंद्र सरकार द्वारा इतर मागास वर्गाची जातनिहाय जनगणना, ईव्हीएम बंद करुन बैलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, खाजगी क्षेत्रामध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षण, एमएसपी गॅरंटी कायदा बनवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एनआरसी, सीएए, एनपीआरला विरोध, जूनी पेंशन योजना लागु करणेसाठी, मध्यप्रदेश, ओडीसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदार संघ लागू करणेसाठी, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमीन यापासुन विस्थापित करण्याच्या विरोधात, जबरदस्तीने कोरोना लसीकरणास विरोध आदी न्याय मुद्द्यावर सर्वसामान्यांच्या सामाजिक हितासाठी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्यासह पदाधिकारी रस्त्यांवर उतरुन दुकानदारांना करीत होते.