जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारातील हरिओम नगरात राहणाऱ्या रहिवाशांनी मंजूर असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी सोमवारी २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता थेट महापालिका आयुक्तांना भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महापालिकेतून रस्ता मंजूर असताना तो रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडून ठेकेदाराने पुढील काम करण्यास मनाई केल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या दलित निधी अंतर्गत मंजूर झालेला रस्ता हा खेडी शिवारातील बैठक भवन ते ज्ञानचेतन अपार्टमेंट पर्यंत मंजूर करण्यात आला आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे अर्धेच काम पूर्ण केले आहे. त्यामुळे हरीओम नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना व शाळकरी मुलांना ये-जा करण्यास प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपूर्ण असलेला रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर गोपाल जाधव, सदाशिव भारंबे, वासुदेव इंगळे, कमलेश तळेले, हरिभाऊ चौधरी, राजू पाटील, निवृत्ती चौधरी, गणेश कदम, रमेश सुरवाडे, आशिष पाटील, राजू कळसकर यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.