रावेर भूमी अभिलेख कार्यालयात आ. जावळे यांची झाडाझडती

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर नागरिक आणि शेतकऱ्यांकडून प्रचंड तक्रारी येत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत आ. अमोल जावळे यांनी आज अचानक भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

भूमी अभिलेख विभागाकडून सातबारा उतारा (7/12), आठ-अ उतारा (8A), भू-सर्वेक्षण, डिजिटल मॅपिंग आणि ई-मोजणी या संदर्भातील तक्रारींची दखल घेत आमदार जावळे यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित का आहेत? त्यांचे निराकरण का होत नाही? असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून रावेर भूमी अभिलेख कार्यालयाच्या ढिसाळ कारभाराची तक्रार नोंदवली.

या भेटीदरम्यान कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचारी सैरभैर झाले, तर अनेक शेतकरी आणि नागरिकांनी आपले अडलेले प्रश्न आमदार जावळे यांच्यासमोर मांडले. नागरिकांना अधिकाऱ्यांकडून अडवणूक सहन करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा जावळे यांनी दिला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, प्रा. उमाकांत महाजन, दिलीप पाटील, लखन महाजन, पवन महाजन, अजिंक्य वाणी, अमोल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Protected Content