पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात लसीचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली. आ. पाटील यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी जमादार यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. या अनुषंगाने तालुक्यासाठी २० हजार लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
रविवार रोजी पारोळा तालुक्यातील नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन लसीकरणाबाबत लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याची तक्रार केली होती. याची आमदार चिमणराव पाटील यांनी त्वरित दखल घेत जिल्हाचे आरोग्य अधिकारी जमादार यांचेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदरील परिस्थिती लक्षात आणून दिली. पारोळा तालुक्यासाठी जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करण्यात यावा, अश्या सूचना केल्या. त्याच अनुषंगाने आरोग्य अधिकारी जमादार यांनी सोमवारी संध्याकाळ पर्यंत २०,००० लसींचे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले.