आ. पाटलांनी ४० वर्षाचा प्रश्न सोडवला अवघ्या ४० मिनिटात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दोन जीन चालकांच्या वादात ४० वर्षांपासून बंद असलेला एक रस्ता व नाल्याचा प्रश्न आमदार अनिल पाटील यांनी अवघ्या ४० मिनिटात मध्यस्थीने सामंजस्याचा मार्गाने मोकळा केला. यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय दूर झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी चाळीस वर्षांपासून बंद असलेला रस्ता मोकळा केल्यानन्तर क्रांती नगर ,विद्यानगर , दौलत पार्क ,राधाकृष्ण नगर ,सानेगुरुजी पतपेढी आदी भागातील नागरिकांनी देखील शेतकी संघ जीन आणि पद्माकर गोसावी यांची जीन यांच्या दरम्यान असलेला वहिवाटीचा रस्ता चाळीस वर्षापासून बंद आहे . याच भागातून मंगरूळ शिवारातून येणारे पाणी वाहून येत असल्याने त्याचे खोलीकरण करता येत नाही म्हणून नागरिकांना पावसाळ्यात अतिशय त्रास होत होता. हद्दीच्या वादातून दोन्ही जीन चालकांचे अनेक वर्षांपासून उच्च न्यायालय ,दिवाणी न्यायालय येथे वाद सुरू होते. त्यामुळे ना रस्ता मोकळा होत होता ना नाला सफाई अथवा खोलीकरण होत होते. पाणी प्रवाह बंद झाल्याने ते कॉलनीत शिरत होते.

बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, नगरसेवक विवेक पाटील, ऍड यज्ञेश्वर पाटील, संजय पाटील व नागरिकांनी यांनी अनेक दिवसांपासून या समस्येचा पाठपुरावा केला होता. पावसाळ्यापूर्वी ही समस्या सुटलीच पाहिजे व रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे म्हणून अखेर २७ रोजी आमदार अनिल पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शेतकी संघ मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील , व्यवस्थापक संजय पाटील , दुसरे जीन चालक पद्माकर गोसावी, उद्योगपती प्रवीण पाटील पालिका अभियंता, अतिक्रमण विभाग, वीज मंडळ अभियंता यांच्या लवाजम्यासह घटनास्थळी पोहचला. भूमिअभिलेख विभागाच्या तीन चार मोजण्यात मापामधून असणारी तफावती मुळे अधिकारी देखील संभ्रमात होते.

अखेर अनिल पाटील यांनी तुमच्या हद्दीच्या वादात नागरिकांची हेळसांड करू नका, दोघा जीन चालकांनी थोडे फार कमी जास्त नुकसान सहन करा आणि नागरिकांची सोय करा असे समजावल्यानंतर हा प्रश्न तात्काळ मिटला आणि लागलीच रस्ता मोजणी व आखणी करण्यात आली. नाला खोलीकरण व साफसफाईला सुरुवात झाली. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यात अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब काढून घेण्याचे आदेश देखील आ.अनिल पाटील यांनी दिले. तसेच रस्ता व नाल्याचे अंदाज पत्रक अभियंत्यांना बनवण्यास सांगितले. लवकरच या कामासाठी निधी आणणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. आमदारांनी चाळीस वर्षाचा प्रश्न अवघ्या चाळीस मिनिटात मिटवल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी पालिकेचे संजय चौधरी , बांधकाम अभियंता दिगंबर वाघ , नगररचनाकर विकास बिरारी , विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर ,वीज मंडळाचे अभियंता विनोद देशमुख , अभियंता फुरसुंगे , ऍड यज्ञेश्वर पाटील ,सहकार अधिकारी आर एस पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक ,एल टी पाटील ,नगरसेवक राजेश पाटील , पंकज पाटील ,दीपक चव्हाण , चंपालाल शिंदे ,ईश्वर पाटील ,कमलेश पाटील ,महेश जोशी हजर होते.

Protected Content