राज्यात भाजपा-सेना युती होण्याचे स्पष्ट संकेत

66920465

नवी मुंबई, वृत्तसंस्था | अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आज (दि.२५) येथे आयोजित मेळव्याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आमचे सरकार सदैव माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी उभे राहणार आहे. देशाच्या प्रगतीत माथाडी कामगारांचा मोठा सहभाग आहे. तर, राज्यातील आगामी निवडणूक आम्ही जिंकणारच, राज्यात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या दोन्ही नेत्यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात म्हटले की, पहिल्यांदाच आज माथाडी कामगारांसमोर आलो आहे. हा भावनिक सोहळा आहे, तो काळ लढाईचा काळ होता बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांनी मुंबईत मराठी माणसांमध्ये संघर्षाची ताकद पेटवली. ते आपल्या अनुयायांशी प्रामाणिक राहणारे नेते होते. बाळासाहेब आणि अण्णासाहेब एकत्र आले, पण ते जर गेले नसते तर या महाराष्ट्र राज्याने पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झालेला पाहिला असता. असेही ते म्हणाले

राज्यातील निवडणूक आम्ही जिंकणार आहोतच, राज्यात महायुतीचेच सरकार येणारच आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र हे सर्व तुमच्या हातात असल्याचेही त्यांनी कामगारांना उद्देशून म्हटले. ५० वर्षे झाली तरी माथाडी कामगार चळवळ यशस्वीपणे सुरूच ठेवल्याबद्दल त्यांनी नरेंद्र पाटील यांचे विशेष कौतुकही केले. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Protected Content