यावल शहरात स्वच्छता मोहिम; आ. जावळेंची उपस्थिती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवार, २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत यावल शहरातील प्रमुख सरकारी कार्यालये तसेच मुख्य गल्ल्या स्वच्छ करण्यात आल्या. या मोहिमेत तालुकाभरातून २५६ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या अभियानात १२ ट्रॅक्टरच्या साहाय्याने एकूण १४२.७५ क्विंटल कचरा गोळा करून नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर जमा करण्यात आला. त्यामध्ये १०१.३० क्विंटल सुका कचरा आणि ४५.४५ क्विंटल ओला कचरा होता. या मोहिमेमुळे यावल नगर परिषद क्षेत्र आणि शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ व टापटीप झाला आहे.

स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्त या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमास यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भेट देऊन श्री सदस्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी स्वतः स्वच्छतेत सहभाग घेतला आणि श्री सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेमुळे यावल शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असून नागरिक व विविध संस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Protected Content