आर्यन खानला क्लिन चीट: वानखेडेंवर होणार कारवाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान  याला एनसीबीनं कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात  क्लिनचिट दिली असून यामुळे आता तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुराव्यांअभावी सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ ही २९ मे रोजी संपणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीनं आज आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायालयात एनसीबीनं आपलं अंतिम आरोपपत्र दाखल केलंय. यात आर्यन खान याच्यासह सहा जणांना निर्दोष मानून त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत.   गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकताना अटक करण्यात आलेल्या २३ जणांमध्ये खानचा समावेश होता.

आर्यन खान प्रकरणात महाविकास आघाडी सरकार विरूध्द भाजप असा सामना रंगला होता. यात भाजपने समीर वानखेडे यांची बाजू घेतली होती. मात्र आज आरोपपत्रातून आर्यन खानचे नाव वगळण्यात आल्यानंतर आता सरकारने वानखेडे यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

 

Protected Content