अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झालेले प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट दिल्याचे आता समोर आले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. अस्तित्त्वातच नसलेल्या रस्त्याच्या कामाच्या बदल्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. एकूण १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला असल्याचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आलेला होता. हे संपूर्ण प्रकरण कोर्टातही गेलं होतं. बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फकवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा कडू यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीही केली जात होती. अखेर या संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं हे प्रकरण तथ्यहिन असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची ही फाईल आता पोलिसांनी बंद केल्याची माहिती समोर आली असून याबाबत एबीपी-माझा वाहिनीने वृत्त दिले आहे. कडू यांना बंडाचे हे फळ मिळाल्याचे आता मानले जात आहे.