‘क्लास ऑफ ८३’ वादाच्या भोवर्‍यात; एन्काऊंटर स्पेशालिस्टने घेतला आक्षेप !

मुंबई प्रतिनिधी । बॉबी देओलचा प्रदर्शीत होण्यासाठी सज्ज असलेला ‘क्लास ऑफ ८३’ हा चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडला असून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.

‘क्लास ऑफ ८३’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मात्र याच्या प्रदर्शनाचा मार्ग थोडा खडतर बनल्याचे दिसून येत आहे. या सिनेमामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दाखवण्यात आले आहे. यावरून प्रदीप शर्मा यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

शाहरुख खानच्या रेड चिली एन्टरटेनमेंट प्रा. लि., नेटफ्लिक्स एन्टरटेनमेंट सर्व्हिस इंडिया लिमिटेड आणि सैय्यद हुसैन जैदी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आपल्याला दाखवला जावा. अन्यथा हायकोर्टातून या सिनेमाच्या रिलीजला ‘स्टे’ आणला जाईल. एवढेच नव्हे तर निर्मात्यांविरोधात सिव्हील आणि क्रिमिनल केस देखील दाखल केली जाईल, असे शर्मा यांनी आपल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

‘क्लास ऑफ ८३’मध्ये या सिनेमामध्ये बॉबी देओल बरोबर अनुप सोनी, विश्‍वजीत प्रधान, जॉय सेनगुप्ता हे महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटात आपल्याला अथवा आपल्या बॅचच्या पोलीस अधिकार्‍यांचा अवमान झाला नसल्याची खात्री झाल्याशिवाय हा सिनेमा आपण रिलीज होऊ देणार नाही, असे शर्मा यांचे म्हणणे आहे.

याआधी ‘क्लास ऑफ ८३’ नावाचे एक पुस्तकदेखील प्रकाशित झाले आहे. सैयद हुसेन जैदी यांनी लिहलेले हे पुस्तक एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर आधारलेले आहे. आता यावरच चित्रपट येत असतांना खुद्द प्रदीप शर्मा यांनीच याला आक्षेप घेतला आहे.

Protected Content