जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक ५ मे रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे. आता या परीक्षेच्या गुणपत्रिका प्रत्यक्ष शाळांमध्ये कधी मिळणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली होती.
या संदर्भात शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रे (Leaving Certificate) आणि तपशीलवार गुणपत्रकांचे शालेय अभिलेख येत्या दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत.
मंडळाने पुढे स्पष्ट केले आहे की, शाळा आणि महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी १६ मे रोजी दुपारी ३ नंतर आपल्या महाविद्यालयातून गुणपत्रिका प्राप्त करू शकतील.
शिक्षण मंडळाचे सचिव श्री. देविदास कुलाळ यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे त्यांनी सर्व प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी याची योग्य नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची मूळ प्रत आता लवकरच त्यांच्या हातात मिळणार असल्याने त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मदत होणार आहे.