नवीदिल्ली, वृत्तसंस्था | गुन्हेगारी जगातातील कुप्रसिद्ध अशा डी-कंपनीचा सदस्य व अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने आपला प्रतिस्पर्धी राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनच्या हत्येचा नवा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या छोट्या राजनच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मदतीने कराचीतून आपला कारभार चालवतो. त्याने आता कथितरित्या येथील त्यांच्या हस्तकांवर तिहार तुरूंगातच हत्येची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती आहे. या संदर्भात तिहार तरुंगाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप गोयल यांनी, ज्या ठिकाणी राजनला ठेवण्यात आले आहे, तेथील सुरक्षा वाढवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
गोयल यांनी सांगितले की, मी केवळ सुरक्षेसंदर्भातच बोलू शकतो. राजनला अत्यंत उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे व कडेकोट सुरक्षा असेल यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहोत. मात्र मी त्याला देण्यात आलेल्या धमकीबाबत काहीही सांगू शकत नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजनला अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या क्रमांक दोनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी २४ तास तामिळनाडू पोलीस दलाच्या विशेष जवानांकडे असते.
अन्य एका सुत्राकडून देखील माहिती मिळाली आहे की, राजनला धमकी आल्याचे समजल्यानंतर त्याला जेवण देणारा स्वयंपाकीही तीनवेळा बदलण्यात आला आहे. याशिवाय त्याला दिल्या जाणाऱ्या जेवणाची वेळोवेळी तपासणी होत आहे. तुरुंगातील कोणीही त्याच्यापासून किमान १० मीटर अंतरावर राहील याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच, माफिया डॉन मोहम्मद शहाबुद्दीन हा ही क्रमांक दोनच्या तुरुंगात आहे. या तुरुंगात राजन आणि शहाबुद्दीन यांना भेटण्यास परवानगी नाही, या ठिकाणी २४ तास गुप्त कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
गुप्तचर संस्थांच्या हाती काही दिवसांपूर्वी एक फोन रेकॉर्डिंग आली होती, ज्यामध्ये शकील तुरुंगातच छोटा राजनचा खात्मा करण्याच्या कटाबाबत चर्चा करत होता. तसेच, कथितरित्या छोटा राजनला कोठडीतच विष देऊन ठार करण्याबाबत देखील बोलले जात होते, असे सांगण्यात आले आहे.
छोटा राजन यास २०१५ मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. त्याला मागील वर्षी पत्रकार जे डे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातच मुंबईतील विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी.आर. शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणी आठ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या सहाही आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.