चोपडा महाविद्यालयात १० हजार विद्यार्थ्यांना मिळते शिक्षण

3a5cc6eb dfb4 44ab bd1c 83b3a4eeea50

चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या स्थापनेला जून २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली असून संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी आज (दि.२३) एका पत्रकार परिषदेत दिली.

 

ते पुढे म्हणाले की, ५० वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, विविध कोर्सेच्या माध्यमातून महाविद्यालयात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र प्रशस्त इमारती, अत्याधुनिक यंत्र सामुग्री, दर्जेदार शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील रॅगिंग रोखण्यासाठी अँटी रॅगिंग समितीची स्थापना करण्यात आली असून कोणत्याही विद्यार्थिनीला त्रास होणार नाही याची खबरदारी रॅगिंग समिती घेत असते. तालुक्यातील आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी जून १९६९ मध्ये माजी आमदार डॉ.सुरेश पाटील व सहकाऱ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली.

सुरुवातीच्या कालखंडात १४४ विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाचा कारभार सुरू झाला. स्वतःची इमारत नसल्याने विज्ञान आणि कला व वाणिज्य विभागातील वर्ग प्रताप विद्या मंदिर आणि म्युनिसिपल हायस्कुलमध्ये भरत असतांना संस्थेने यावल रोड लगत ३५ एकर जमीन घेऊन तिथे स्वतःची इमारत उभी केली. आज  संस्थेने घेतलेल्या ३५ एकर जमिनीची किंमत २०० कोटी तर महाविद्यालयातील सर्व विभागांच्या प्रशस्त इमारतीचे मूल्य १७५ कोटी रुपये आहे. सर्वांच्या सहकार्याने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासामध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. चोपड्यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यात विविध कोर्सेसच्या माध्यमातून महाविद्यालयात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श समाज घडवण्याचे काम ही संस्था करीत आहे, असेही अॅड. पाटील यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, माजी उपप्राचार्य तथा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा.डी.बी. देशमुख उपस्थित होते.

Protected Content