चोपडा प्रतिनिधी । घरात शिरलेल्या चोरट्यांशी दोन हात करणार्या येथील प्रिन्स उर्फ प्रणीत नितीन पाटील या बालकाला यंदाचा राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे.
चोपडा येथील प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील यास राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला असून राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. राज्यपाल बाल आयोगाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दूरध्वनी वरून माहिती दिली. तसेच आज (ता. 17) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल निवड समितीच्या अध्यक्षा गिता सिद्धार्था यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले. पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
5 डिसेंबर 2019 रोजी चोपडा- शिरपूर जुन्या रोडलगत असलेल्या साईविहार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा तरुण- तरुणीने घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला स्प्रे डोळ्यांत मारून लुटमारीचा प्रयत्न केला होता. मात्र, घरात असलेल्या महिलांनी या दोघांशी झटापट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी 12 वर्षीय प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून झुंज दिली होती. यावेळी घरात काम करणाऱ्या महिलेने गॅलरीत जाऊन चोर- चोर आवाज दिल्याने अपार्टमेंटमधील रहिवासी जमा झाले. त्यावेळी दुचाकीवरून पसार होताना दोघांना पकडून चोप दिला. प्रणितच्या या धाडसाचे कौतुक झाले आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता.