जळगाव प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्रास देत असल्याचा केलेला आरोप म्हणजे बालिशपणा आहे. त्यात तथ्य किंवा अर्थही नाही, अशी प्रतिक्रिया पारोळ्याचे माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना आमदार चिमणराव पाटील यांच्या भूमीकेवर सडकून टिका करीत माजी आमदार सतिष पाटील पुढे म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे माझा पक्षही या आघाडीत आहे. पालकमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा चिमणराव पाटील यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली बाजू मांडायला हवी होती. असे जाहीरपणे काहीतरीच बोलण्यात अर्थ नसतो. चिमणराव पाटील यांना त्यांच्या मुलाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख करायचे होते. मात्र शिवसेना नेतृत्वाने ते पद डॉ. हर्षल माने यांना दिले. या शल्यातूनच आमदार चिमणराव पाटील यांनी अशी आगपाखड केली असावी. या संतापातून एकच दिसते की, ते नेहमी चुकीच्या पध्दतीने राजकारण करतात आणि चुकीच्या पध्दतीने राजकारण हेच त्यांचे आत्तापर्यंत धर्म आणि कर्म राहिले आहे.
आमदार चिमणराव पाटील म्हणतात की २०१४ सालात त्यांचा पराभव घडवला गेला. मात्र हा पराभव कसा व कुणी घडवला हे सांगायला ते तयार नाही. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यातही अर्थ वाटत नाही. आमच्या मतदार संघात २०१४ साली कुणी शिवसेनेचा बंडखोर नेता नव्हता. मग त्यांचे मते कुणी खाल्ली हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. चिमणराव पाटील कधी शिवसेनेत आले हेही सगळ्यांना माहिती आहे. चिमणराव पाटील यांच्यापेक्षा गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत. गुलाबराव पाटील चौथ्यांदा निवडून आले आहे. शिवसेना पक्ष संघटनेसाठी त्यांचे काम चिमणराव पाटलांपेक्षा मोठे आहे. डॉ. हर्षल माने गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेसाठी सक्रिय आहेत. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर आपल्या मुलाची निवड व्हावी म्हणून चिमणराव पाटील आठवडाभर मुंबईत होते. मात्र शेवटी त्या पक्षाच्या नेत्यांनी हर्षल पाटील यांची निवड केली. मतदार संघात जे सध्या सुरू आहे. ते चुकीचे आहे. असे वाढते म्हणूनच मी हे बोलतो आहे. काहीतरी आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडायचे. बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण शोधायचे, म्हणून तर चिमणराव पाटलांचा हा खटाटोप नाही ना, अशी शंका येते. समजा चिमणराव पाटील शिवसेनेतून बाहेर पडले तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महत्व देणार नाही. मग शेवटी त्यांच्यापुढे भाजपा हाच पर्याय त्यांना दिसत असावा. अशी शंका घेण्यास जागा आहे. शेवटी आपली हुकूमशाही चालावी हीच आमदार चिमणराव पाटलांची वृत्ती असल्याचा आरोपही माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी केला.