यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतातील बालकांच्या हक्कासाठी ॲक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. भारतामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे प्रत्येक चार मुली मागे एका मुलीचा अठरा वर्षाचा आत विवाह होऊन त्यांच्यावर मातृत्व लादले आहे. मुल हरवणे, बालकांची अपव्यापारासाठी तस्करी होणे, बालकांचा कामगार म्हणून भिक्षेकरी म्हणून अप व्यापार होण्याचे प्रमाण गंभीर व चिंताजनक आहे. बालविवाह मुक्त भारत ,बाल तस्करी, बालमजुरी प्रतिबंध,बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या विषयावर या प्रकल्पात बालकांच्या हक्कासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यू एस यांच्या सहकार्याने भारतामध्ये तसेच जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या सहयोगाने आधार बहुउद्देशीय संस्था बालकांच्या हक्कासाठी व बाल अत्याचार प्रतिबंध तसेच बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी ५० गावांमध्ये जाणीव जागृती कार्यक्रम बालविवाह रोखणे, बाल बाल तस्करी थांबविणे यामध्ये जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आधार संस्था, एक्सेस टू जस्टीस प्रकल्पाची टीम कार्य करीत आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग बाल संरक्षण विभाग,रेल्वे पोलिस,ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका प्रशासन, पोलिस प्रशासन इत्यादी विविध संबंधित घटकांबरोबर बालकांना न्याय देण्यासाठी कार्य सुरू करण्यात आले आहे .
आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील, संचालिका रेणू प्रसाद, एक्सेस जस्टीस प्रकल्प समन्वयक विद्या सोनार, निवेदिता ताठे, आनंद पगारे, अशोक तायडे, जीवन मोरे, पूनम जगदाळे,दीपक संदानशिव जोरदार बारेला,सुनील हिवाळे, श्रीराम राठोड यांच्यासह टीम मेंबर्स, समुपदेशन केंद्र समुपदेशक कार्यरत आहे. प्रकल्पाच्या उपक्रमात प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना सापडलेल्या मुलांची सुटका व पुनर्वसन करण्याचे कार्य सुरू झालेले आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक अशा उपक्रमात सर्व समाज घटकांनी आणि संवेदनशील नागरिकांनी एक्सेस टू जस्टीस प्रकल्प जळगाव जिल्ह्यात यशस्वी पूर्ण रीतीने राबविण्यात सहकार्य करावे असे आवाहन आनंद पगारे जिल्हा प्रकल्प समवयक यांच्या वतीने करण्यात येत आहे.