राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. बुधवारी सकाळी 7 वाजता लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 3 फेब्रुवारी रोजी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना अयोध्येहून लखनऊला तातडीने हलवण्यात आले होते.

आचार्य सत्येंद्र दास यांचे पार्थिव अयोध्येत त्यांच्या आश्रम सत्यधाम गोपाळ मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी तब्बल 32 वर्षे रामजन्मभूमीवर मुख्य पुजारी म्हणून सेवा बजावली. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी विध्वंसाच्या वेळी त्यांनी रामलल्लाची मूर्ती कडेवर उचलून सुरक्षित ठिकाणी नेली होती, हा प्रसंग आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांचा जन्म 20 मे 1945 रोजी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात झाला, जो अयोध्येपासून सुमारे 98 किमी अंतरावर आहे. लहानपणापासूनच भक्तीभावाने प्रेरित असलेल्या सत्येंद्र दास यांचे वडील अयोध्येला वारंवार भेट देत असत आणि सत्येंद्र दासही त्यांच्यासोबत जात असत. त्यांच्या वडिलांचे अभिराम दासजींच्या आश्रमात जाणे-येणे होते आणि सत्येंद्र दास यांनाही तेथे भक्तीमय वातावरणाचा प्रभाव जाणवू लागला.

1949 मध्ये अभिराम दास यांनी रामजन्मभूमीच्या गर्भगृहात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीतेच्या मूर्ती प्रकट झाल्याचा दावा केला होता. या प्रसंगाचा सत्येंद्र दास यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. मूर्तींच्या सेवेने प्रेरित होऊन त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि 1958 मध्ये घर सोडले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ असून, त्यांची बहीण दिवंगत झाली आहे.

जेव्हा सत्येंद्र दास यांनी संन्यास घेण्याचा निर्णय आपल्या वडिलांना सांगितला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी आश्चर्य व्यक्त न करता त्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या वडिलांचे शब्द होते, “माझा एक मुलगा घर सांभाळेल आणि दुसरा रामलल्लाची सेवा करेल.” हा आशीर्वादच सत्येंद्र दास यांच्या आयुष्याच्या प्रवासाला दिशा देणारा ठरला.

आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येतील धार्मिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या सेवाभावी आणि निःस्वार्थ भक्तीने अयोध्येतील रामलल्ला मंदिराचे वैभव अनेक दशके उजळवले. त्यांचे योगदान अयोध्येच्या धार्मिक इतिहासात सदैव अजरामर राहील.

Protected Content