जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटुळे, जिल्ह्याच्या कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साहाय्य पुरवले जाते. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शासनाने यापूर्वीच निर्णय जारी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा स्तरावर हा कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या कक्षाच्या स्थापनेमुळे आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी मंत्रालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. जिल्हा स्तरावरच त्यांना अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाच्या प्रगतीचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत. यामध्ये अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि योग्य मार्गदर्शन पुरवणे, आवश्यक कागदपत्रांची यादी सहज उपलब्ध करणे, संलग्न रुग्णालयांची माहिती देणे, मंत्रालयातील हेलपाटे थांबवणे आणि अर्जाची स्थिती स्थानिक पातळीवरच कळवणे यांचा समावेश आहे.
या कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी कामकाज पाहणार असून, ते नियमितपणे आढावा घेतील. यामध्ये रुग्णांना अर्ज प्रक्रियेत मदत करणे, अर्जाच्या स्थितीची माहिती देणे, तक्रारींचे निवारण करणे, लाभार्थ्यांच्या रुग्णालयांना भेटी देणे, योजनेची जनजागृती करणे, पात्र आजारांचे पुनर्विलोकन करणे, आपत्तीग्रस्त भागांना भेट देऊन मदतीचे नियोजन करणे, निधीसाठी देणग्या वाढवण्यावर भर देणे आणि लाभार्थी आजारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे यांसारख्या कामांचा समावेश असेल. राज्यस्तरीय कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.