मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित

maha yatra sthagit

बुलडाणा, प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूर येथे दिली. यावेळी अरुण जेटली यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

 

याआधी महापुरामुळे महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून धुळे नंदूरबारपासून सुरु झाला. मात्र आज अरुण जेटलींचे निधन झाल्याने पुन्हा एकदा ही महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून मलकापूरमध्ये आली. तेव्हा कुठलेही स्वागत न स्वीकारता सरळ मुख्यमंत्री स्टेजवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या निधनाने फार मोठी हानी झाल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले नेते म्हणून जेटली यांची कारकीर्द होती, ते निष्णात वकील होते, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अवघ्या नऊ मिनिटात आपले भाषण आटोपून फडणवीस रवाना झाले.

Protected Content