मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या अयोध्येत होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी स्वत: एक्स या मंचावरून एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
उद्या अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असून यासाठी देशभरातील आठ हजार निवडक मान्यवरांना याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. यात, राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा देखील समावेश आहे. या सोहळ्याला काही तास उरले असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट करत महत्वाची घोषणा केली आहे.
या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, जय श्री राम्! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे. यासाठी मोदींचे शतशः आभार. अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.