अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अतिरिक्त मिलेट्सच्या चॉकलेट बारचे वितरण केले जाते. याच मिलेट्सच्या चॉकलेट बारमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागातील मेळघाटमधील गडगा भांडुप शाळेत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. ही बाब शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे समोर आले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमामार्फत अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील शाळांना मिलेट्स बारचा शाळा स्तरावर पुरवठा करण्यात येतो. चॉकलेट मिलेट, न्यूट्रीट्यूव्ह बार विथ रागी, मिक्स फ्रूट मिलेट न्यूट्रीटीव्ह बार विथ जवार व पिनट बटर मिलेट न्यूट्रीटिव्ह बार विथ बाजरा या तीन प्रकारच्या मिलेट बारचे वितरण करण्यात येत आहे. अमरावतीच्या पंचायत समिती धारणी व चिखलदरा येथील आदिवासी क्षेत्रातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना या बारचे वितरण होत आहे. नागपूरच्या कामठी मधील जस्ट किचन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला मिलेट्स बार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे.
त्यानुसार संबंधित संस्थेकडून मार्च-एप्रिल महिन्यात मेळघाटातील शाळांमध्ये मिलेट्स बारचे वितरण करण्यात आलं होतं. त्यानुसार चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गडगा भांडुप शाळेमध्ये निकृष्ट दर्जाच्या मिलेट्स बारचा पुरवठा झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मिलेट्स बारच्या पाकिटांमध्ये चक्क अळ्या निघाल्याचा प्रकारही येथे काही पालकांनी समोर आणलाय. अति दुर्गम भागातील शाळांमध्ये निकृष्ट दर्जाच्या मिलेट्स बारचे वितरण होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारावर शिक्षण विभागाकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आल्याचेही समोर आलय तर निकृष्ट मिलेट्स बारचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी देखील नागरिकांकडून होऊ लागली आहे.