पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन झाल्यापासून स्मारक अंतर्गत स्वच्छता व दिवाबत्तीची व्यवस्था दुर्लक्षित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा यांच्यातर्फे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना देण्यात आले.
पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज बुधवार, दि. २७ एप्रिल रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले. श्रीमंत छत्रपतींचे स्मारके व पुतळे जनतेची बलस्थाने असून पाचोरा येथील शंभूराजे यांच्या स्मारकाला सार्वजनिक स्ट्रीट लाइटचा उसनवार प्रकाश देऊन महाराजांचा अनादर करत असल्याची खंत या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे.
सदर निवेदनात छत्रपती संभाजी महाराजांच्या भडगाव रोड वरील स्मारकाबाबत विविध सेवा सुविधा व उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे आधुनिक व आकर्षक प्रकाश व्यवस्थापन करण्यात यावे, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर कायमस्वरूपी स्वच्छता तथा सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने स्मारकाची दरवर्षी रंगरंगोटी करण्यात यावी, छत्रपती संभाजी महाराज चौकातील वाढणारे लहान-मोठे अतिक्रमणे कायमस्वरूपी काढण्यात येऊन स्मारका शेजारील ५०० मीटरचा परिसर “नो हॉकर्स झोन” म्हणून जाहीर करण्यात यावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या सौंदर्याला अडसर ठरणारे बॅनर व पोस्टर लावण्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी, छत्रपती संभाजी महाराज चौकात शंभूराजे यांच्या नावाने “छत्रपती राजे संभाजी महाराज चौक” असा आकर्षक व आधुनिक नाम फलक लावण्यात यावा, छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या रिक्षा स्टॉपला प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त रिक्षा थांबा देण्याची व्यवस्था करावी, छत्रपती संभाजी महाराज चौकाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व चौकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावर नवनवीन संकल्पना राबवून स्मारक व परिसराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण याबाबत विविध उपाययोजना कराव्यात, इत्यादी मागण्या दि. १४ मे २०२२ पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी आग्रही मागणी मराठा महासंघातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या मागण्यांना प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी शिष्टमंडळाला दिली.
निवेदनावर अ. भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा.साहेबराव थोरात, उपाध्यक्ष सुनिल देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल बोरसे, तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शहर कार्याध्यक्ष अमोल पाटील, शहर सरचिटणीस कुणाल पाटील, युवक शहराध्यक्ष कुंदन पाटील, शहर उपाध्यक्ष अक्षय देशमुख, शहर उपाध्यक्ष सागर भोसले, प्रसिद्धी प्रमुख गणेश शिंदे, आदींच्या स्वाक्षरी होत्या. याप्रसंगी मराठा महासंघाचे प्रेम राज पाटील, गोपाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.