Quarrel : नळावरचं भांडण – लाठ्याकाठ्यासह कुर्‍हाडीने हल्ला; हाणामारीत सहा जखमी, एक गंभीर

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बोरावल गेट भागात पाणी भरण्यासाठी नळी लावण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये सात जणांनी लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने एकाच कुटुंबातील सहा जणांवर हल्ला केला यात सहा जण जखमी असून यातील एक गंभीर आहे.

गुरुवार, दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

याविषयी “शहरातील बोरावल गेट भागातील रहिवाशी कमाबाई राजू पटेल यांनी यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांची नात आयेशा फारूक पटेल व मुलगी फरीदा पटेल हे शेजारील दत्तू धनगर यांच्या घरातून नळाचे पाणी घेण्यासाठी नळी लावत होत्या. तेव्हा त्यांच्या घराशेजारी मीना समशेर तडवी व तिची मुलगी फातिमा समशेर तडवी या दोघी आल्या व त्यांनी शिवीगाळ करून आम्ही तुम्हाला पाणी भरू देणार नाही असे बोलून त्यांची नळी हिसकावून घेतली व त्यांना मारहाण करून त्या तिथून निघून गेल्या.

नंतर थोड्यावेळाने पुन्हा मीना समशेर तडवी व तिची मुलगी फातिमा समशेर तडवी, आरिफ राजू तडवी, सरफराज समशेर तडवी, शहारुख सिकंदर तडवी, गोलू कलींदर तडवी व कलिंदर रमजान तडवी असे हातात कुर्‍हाड व लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि कमाबाई यांचे पती राजू लतीफ पटेल (वय ६५) हे घराबाहेर खाटेवर झोपले असताना आसिफ तडवी याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीद्वारे त्यांच्या डोक्यावर व उजव्या हातावर वार करत गंभीर दुखापत केली. इतर लोकांनी लाट्या काठ्यांनी जब्बार राजू पटेल, अरबाज राजू पटेल नसीम आरिफ पटेल, फरीदा पटेल व आयेशा पटेल यांना मारहाण केली.

या मारहाणीत रक्तबंबाळ अवस्थेत या कुटुंबातील काही जण रस्त्यावर पडले असताना नागरिकांनी धाव घेतली व त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल केले. या ठिकाणी डॉ.शुभम तिडकेसह आदींनी त्यांच्या प्रथम उपचार केले. तर यातील राजू पटेल, जब्बार पटेल व अरबाज पटेल यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

यात राजू पटेल यांची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी वरील फिर्यादीनुसार सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती तर गर्दीला पांगवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, सहायक फौजदार असलम खान, राहुल चौधरी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

डीवायएसपी यांची भेट.

शहरातील घटनेची माहिती कळताच फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी तातडीने यावल पोलीस स्टेशन गाठले व फिर्यादी यांची विचारपूस करून घेतली तसेच या गुन्ह्यातील संशयितांना तातडीने अटक करण्याची सूचना त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content